Jalgaon News

Jalgaon News Jalgaon News is an Online Website giving latest News,updates of Jalgaon City & Jalgaon District.

Jalgaon News is Unique & No.1 online Website & Mobile App to get official News of Jalgaon City & District.

14/09/2023

अमळनेरहून धरणगाव जाण्यासाठी ढेकू - सारबेटे मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

जळगाव, दि.१४ - अमळनेरहून धरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी कुर्हे- सती माता मंदिर येथे अंतर्गत बोगद्याचे काम सुरू असल्याकारणाने सदर रस्ता दूचाकी वगळता सर्व जड वाहनांसाठी पुढील चार महिन्यासाठी बंद करण्यात आलेला आहे. वाहनधारकांनी अमळनेरहून धरणगाव कडे जाण्यासाठी ढेकू- सारबेटे मार्गाचा वापर करावा, असे आवाहन अमळनेर रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

अमळनेरहून धरणगाव जातांना चांदणी कुर्हे- सती माता मंदिर येथे फाटक क्रमांक १३७ येथे एका बाजूच्या बोगद्याचे काम झाले आहे. एका बाजूचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे १८ सप्टेंबर पासून हा मार्ग पुढील चार महिन्यांसाठी जड वाहनांसाठी बंद असणार आहे. दूचाकी वगळता एसटी, ट्रक, ट्रॅक्टर, मालट्रक यांसारख्या जड वाहनांनी धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

14/09/2023

महाबीजच्या बिजोत्पादन अभियानात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगांव,दि.१४- रब्बी ज्वारी, हरभरा, गहू बियाण्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी महाबीज मार्फत जिल्ह्यात बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.‌ या अभियानात सहभागी होण्यासाठी रावेर, एरंडोल, जळगाव, पाचोरा येथील कृषी क्षेत्राधिकारी यांना संपर्क साधावा, असे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका गावात कमीत कमी २५ एकर बिजोत्पादन कार्यक्रम होणे अपेक्षीत असून एका शेतकऱ्याने कमीत कमी २ एकर क्षेत्र नोंदणी तथा पेरणी करणे अनिवार्य आहे. बिजोत्पादन योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे पायाभूत बियाण्याचा पुरवठा‌ करण्यात येणार आहे. बियाणे शुल्क, सातबारा उतारा व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत शेतकऱ्यांनी बियाणे उचल करण्यापूर्वी जिल्हा कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे.

या अभियानात सहभागी होणे व अधिक माहितीसाठी संजय देवरे - (जळगांव, जामनेर, बोदवड) संतोष गडाख (मुक्ताईनगर) श्रीमती मोहिनी जाधव (चोपडा, एरंडोल, धरणगांव) जयु गावित (पाचोरा, भडगांव, चाळीसगांव) असे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

*लम्पीच्या पार्श्वभूमीवर बैल पोळा गोठ्यातच साजरा करा*जळगावच्या पशुसंवर्धन विभागाचे आवाहनजळगाव, दि.१३- जिल्ह्यातील सर्व त...
13/09/2023

*लम्पीच्या पार्श्वभूमीवर बैल पोळा गोठ्यातच साजरा करा
*जळगावच्या पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

जळगाव, दि.१३- जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाय व बैल या जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या साथ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या साजरा केला जाणारा बैल पोळा सण पशुपालकांनी सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची गोठ्यातच पूजा करून साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पीवर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात लम्पीमुळे बैल मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जवळपास ६० टक्के असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बैलपोळा पशुपालकाच्या जिव्हाळयाचा सण आहे. मात्र आपल्या बैलाचे लम्पी स्कीन या संसर्ग आजारापासून संरक्षण व्हावे, आजाराची लक्षणे होवू नये यासाठी पशुपालकांनी पोळा हा सण सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची पुजा गोठयातच करून साजरा करावा.

जनावरांमध्ये लम्पी सदृश लक्षणे दिसून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. लम्पी स्किन आजार जरी संसर्गजन्य असला तरी रोगाचे लवकर निदान झाल्यास व योग्य उपचार त्वरीत सुरू केल्यास आजार ८ ते १० दिवसात बरा होतो. सद्यस्थितीत जळगाव जिल्हयात उपचाराअंती आजार बरा होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाता शासकीय यंत्रणे मार्फत उपचार करून घ्यावे. त्यासोबतच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सहकार्याने गोठा स्वच्छता व गोचिड निर्मूलन करून घ्यावे.असे आवाहनही श्री पाटील यांनी केले आहे.

*कृषी विभागाच्या योजनांचा लाभार्थ्यांना मिळाला लाभ !*कृषी सहसंचालक लाथार्थ्याच्या भेटीसाठी थेट शेतशिवारात*शासन आपल्या दा...
13/09/2023

*कृषी विभागाच्या योजनांचा लाभार्थ्यांना मिळाला लाभ !
*कृषी सहसंचालक लाथार्थ्याच्या भेटीसाठी थेट शेतशिवारात
*शासन आपल्या दारी उपक्रमात कृषी विभागाची कामगिरी

जळगांव,दि.१३- पाचोरा येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात कृषी विभागाच्या वतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध लाभार्थ्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला. यानिमित्ताने कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लाभार्थी शेतकऱ्यांशी शेतशिवारात जाऊन थेट संवाद साधला.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे अनुदानावर पुरवठार करण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाडिबीटी प्रणालीव्दारे अनुदान दिले जाते. शासन आपल्या दारी कार्यक्रमात भडगांव व पाचोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील चेतन रवींद्र ठाकरे यांना रूपये ८ लाख अनुदानाचे स्वयंचलित कम्बाईंड हॉर्वेस्टर यंत्राची चावी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेत पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील रमेश वाघ या लाभार्थ्यास दुध उत्पादक सुगरण डेअरीसाठी १० लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पचायतराज, पर्यटन मंत्री गिरिष महाजन, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव आदी उपस्थित होते.

कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे लाभार्थी सुनील संतोष पाटील यांच्या दोन हेक्टर क्षेत्रावरील मोसंबी लागवड व एक हेक्टर कापूर क्षेत्रावरील ठिंबक सिंचनाची प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी केली. नवल संतोष पाटील यांच्या दीड हेक्टरवरील पेरू लागवड क्षेत्राची पाहणी केली. नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतंर्गत कैलास विश्वनाथ पाटील यांचे ट्रक्टर, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत नांगर-रोटाव्हेटरची पाहणी करून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतील कुटुंबीयांची भेट घेतली मोजें-नांद्रा येथील गिरणाई प्लास्टिक कंपनीस भेट देवून पहाणी व चर्चा केली.

या क्षेत्र भेटीप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंक चलवदे,पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, मंडळ कृषि अधिकारी कैलास घोंगडे, कृषी पर्यवेक्षक यु. आर. जाधव, आर. बी. चौधरी, आर. ए. पाटील, चेतन बागुल, व श्रीमती एस. ए. पाटील, कृषी सहाय्यक व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील लोकहितांच्या प्रकल्पांना गती देण्यात येईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे------- नारपार -गिरणा नदी जोड प्रकल्...
12/09/2023

जळगाव जिल्ह्यातील लोकहितांच्या प्रकल्पांना गती देण्यात येईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-------
नारपार -गिरणा नदी जोड प्रकल्प राबविण्यात येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार*
-----–
पाचोरा येथे शासन आपल्या दारी पाचोरा व भडगाव तालुकास्तरीय कार्यक्रम संपन्न

जळगाव, दि.१२- शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. जळगाव जिल्ह्यात लोकहितांचे नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात दिली.

पाचोरा येथील एम.एम.कॉलेज ग्राऊंड येथे 'शासन आपल्या दारी' या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री‌ एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.जयकुमार रावल, आ.किशोर पाटील,आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटिल , आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

'शासन आपल्या दारी' अभियानात पाचोरा - भडगाव तालुक्यातील ५० हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे‌. असे नमूद करून मुख्यमंत्री श्री शिदे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात आतापर्यंतच्या १४ कार्यक्रमातून १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्र शासनाचे नेहमीच पाठबळ असते. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दहा हजार कोटींचा करमाफी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. 'शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून शासन गतिमान झाले आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक उपक्रम, योजना राबविल्या आहेत. शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले.असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास , शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेत वर्षाला १२ हजार रूपयांची मदत दिली जात आहे. एक रूपयात पीक विमा क्रांतीकारी योजना आहे. शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिली आहे. नैसर्गिक आपत्ती पूर्व सूचना देणारे सॅटेलाईट शासन उभारणार आहे. यावर्षी पाऊस कमी पडला ही वस्तुस्थिती आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जी-२० परिषदेत भारताचा ठसा उमटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासनाने ३५ जल सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे ८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.
-------------
नारपार -गिरणा नदी जोड प्रकल्प राबविण्यात येईल- उपमुख्यमंत्री अजित पवार

नारपार- गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी राज्यसरकार ८ हजार कोटी खर्च करणार आहे. यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गिरणा खोऱ्यातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. निम्न पाडळसे प्रकल्पाच्या कामास निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांचे प्रश्न जागेवर सुटावेत यासाठी 'शासन आपल्या दारी' उपक्रम राबविला जात आहे. प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये दुवा साधणारा हा उपक्रम आहे. शासन आपले आहे‌ ही भावना जनतेत निर्माण करण्याचे काम केले जात आहे‌ . महाराष्ट्रातील सर्वाधिक ठिंबक सिंचन वापर करणारा जळगाव जिल्हा आहे. नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जळगाव जिल्हा केळी व कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात केळी व कापूस प्रक्रिया उद्योग आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही.

राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने रस्त्यांची कामे करणे सहज शक्य झाले आहे. केळी पिकांचा समावेश मनरेगा योजनेत समाविष्ट करण्याचा तसेच जळगाव येथे केळी विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन म्हणाले की, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा. त्यांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागू नये यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहेत‌.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधिक स्वरूपात पाचोरा व भडगाव तालुक्यातील ११ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये शामकांत शामकांत गणपत जोशी (सातडोंगरी, ता. पाचोरा), गणेश गजानन खोदरे (पाचोरा) , रेखा संदीप मोरे,(टोणगाव, ता. भडगाव) सचिन कैलास पाटील,(पाचोरा) साबेरा बी अहमद (भडगाव), दुर्वास जगन्नाथ पाटील (अंजनविहिरी, ता.भडगाव) समर्पित महेश वाघ (गोराडखेडा, ता. पाचोरा), आकाश हिम्मत भिल्ल, (तारखेडा, ता. पाचोरा), भागवत सखाराम बोरसे (आसनखेडा, ता. पाचोरा), पल्लवी मनोहर पाटील (गुढे, ता.भडगाव), प्रविण गंगाराम राठोड (गाळण,ता.पाचोरा) यांचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम राजकुमार आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले‌.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील सरपंचाशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आले‌ आहेत‌. त्यामाध्यमातून जनकल्याण योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना दिला जात आहे.
---------
एका छताखाली २५ शासकीय विभागांचे माहितीचे स्टॉल

शासन आपल्या दारी अभियानाच्या पाचोरा येथील कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे २५ हून अधिक स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री तक्रार कक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी दाखल करून घेऊन त्यांना टोकन नंबर देण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य व उद्योजकता रोजगार मेळाव्यास तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

11/09/2023

पाचोरामार्गे चाळीसगाव चालणारी वाहतूक मंगळवारी एरंडोल मार्गाने वळविली

जळगाव,दि.11- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थ‍ितीत पाचोरा येथे मंगळवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. पाचोरा येथून जळगांव - चाळीसगांव चांदवड हा राज्यमार्ग गेला असून सदर कार्यक्रमाचे दिवशी जळगांव येथून पाचोरामार्गे चाळीसगांवकडे जाणारे अवजड वाहने पर्यायी मार्गावरुन वळविण्यात येणार असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहेत.

जळगांव येथून पाचोरामार्गे चाळीसगांवकडे जाणारे अवजड वाहनांकरिता 12 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पर्यायी वाहतूक मार्ग वळविण्यात आला आहे.
जळगांव येथून पाचोरामार्गे चाळीसगांवकडे जाणारी अवजड वाहने पाचोरामार्गे न जाता जळगांव –एरंडोल- कासोदा- भडगावमार्गे चाळीसगांवकडे जातील. चाळीसगांव येथून पाचोरामार्गे जळगावकडे जाणारी अवजड वाहने चाळीसगांव- भडगांव- कासोदा एरंडोलमार्गे जळगांवकडे जातील, असे आदेशात म्हटले आहे.

11/09/2023

दूध भेसळीविरोधात जिल्ह्यात धडक मोहीम

जळगांव, दि.11 - जिल्ह्यातील दूधात व दूग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून 1 सप्टेंबरपासून दूध भेसळी विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. 15 सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध डेअरी आस्थापनांवर दूध भेसळ व वजनमापनाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली आहे.

अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत अपर पोलीस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.

दूध संस्था, संकलन केंद्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट, इतर सबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेत करण्यात येणार आहे. धडक मोहिमेद्वारे कुणालाही त्रास देणे हा उद्देश नसून दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुध्द दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावेत. हा यामागील उद्देश आहे.

या समितीमार्फत 1 सप्टेंबर रोजी चाळीसगांव येथे 8 डेअरीच्या तपासणीअंती भेसळयुक्त दुध नष्ट केलेले असून 4 डेअरी आस्थापनांवर वजनमापे विभागाने खटले दाखल केलेले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून एक सॅम्पल तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आलेले आहे. जनावरांच्या गोठ्यात अनधिकृत ऑक्सीटोसीनचा वापर आढळल्याने पशुसंवर्धन खात्यामार्फत नाशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 5 सप्टेंबर रोजीच्या धडक तपासणी मोहिमेत एरंडोल येथे 3 वजनमाप खटले दाखल करण्यात आलेले असून 22 लि. भेसळयुक्त दुध नष्ट करून, 2 सॅम्पल्स अन्न व औषध प्रशासनाकडून लॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.

दूध व दूग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, दूध संकलक, विक्रेते यांनी संकलन व विक्री करीत असलेले दूध व दूग्धजन्य पदार्थ हे उच्च गुणप्रतीचे व भेसळविरहित असले पाहिजे व सदर पदार्थाच्या वापराच्या मुदतीचा दिनांक अशा दूध व दूग्धजन्य पदार्थाच्या पॅकेट्सवर/ डब्यांवर स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्य दूध व दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. समितीमार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये दोषी आढळून आल्यास संबंधितांवर लगेचच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व नियमन 2011 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ आढळल्यास जनतेने समितीस तक्रार दाखल करण्याचे आवाहन ही समितीमार्फत करण्यात आले आहे.

11/09/2023

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महावितरणचा ‘एक खिडकी’ उपक्रम

जळगाव, दि.११- जळगावसह धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगाव परिमंडलात सार्वजनिक गणेश मंडळांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. तात्पुरती जोडणीपासून विजेसंबंधीच्या सर्व सोयी-सुविधांच्या पुर्ततेसाठी या ‘एक खिडकी’ उपक्रमाचा फ़ायदा गणेश मंडळांना होणार आहे. उपविभागीय कार्यालयात ही एक खिडकीची सोय उपलब्ध असणार असून याचा गणेश मंडळांनी लाभ घ्यावा,असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

प्रत्येक उपविभागीय स्तरावर एक खिडकीचा उपक्रम दि.11 सप्टेंबर 2023 पासून सुरु करुन सर्व गणेश मंडळांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी सहकार्य करण्याच्या सुचना मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी महावितरण यंत्रणेस दिलेल्या आहेत. गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या जोडण्या या तापुरत्या स्वरुपाच्या असणार असून त्यासाठी घरगूती वर्गवातील वीज दर असणार आहेत. मान्यताप्राप्त व नोंदणीकृत कंत्राटदांकडूनच अधिकाधिक गणेश मंडळांनी अधिकृत जोडण्या घ्याव्यात. वीज जोडणी घेत असतांना वीज सुरक्षेचे सर्व नियम पाळून सुरळीत व सुरक्षित पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा, असेही आवाहन मुख्य अभियंता श्री. कैलास हुमणे यांनी गणेश मंडळांना केले आहे.

शेतकऱ्यांनी कृषी पायभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे : विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांचे आवाहनजळगाव...
11/09/2023

शेतकऱ्यांनी कृषी पायभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे : विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांचे आवाहन

जळगाव, दि.११- केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची जळगाव तालुक्याची कार्यशाळा हॉटेल कोझी कॉटेजमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पायभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले.

केंद्राच्या या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी, युवा शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, शेतकरी संस्था यांनी आपला सद्यस्थितीत असलेला कृषी व कृषी सलग्न उद्योग अथवा नवीन उद्योग सुरू करून बँक कर्ज घेतलेले असल्यास सुमारे दोन कोटीच्या कर्जास ३ टक्के व्याज परताव्याचा लाभ घ्यावा, असेही प्रतिपादन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी युवा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन नोकरीच्या मागे न धावता नोकरी देणारे उद्योजक व्हावे,असे आवाहन उपस्थित युवा शेतकऱ्यांना उद्देशून केले.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी कृषी विभागाच्या अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून लाभ घेतल्यास शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायच्या अनुषंगाने लहान उद्योग निर्मिती केल्यास रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते, याबाबतचे मार्गदर्शन केले. याशिवाय
सदरील कार्यशाळेस नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे व जिल्हास्तरीय कृषी पायभूत सुविधा कक्षाचे नितीन इंगळे यांनी कृषी पायभूत सुविधा निधी व त्याअंतर्गत समाविष्ट असलेले कार्यशाळेसउद्योग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व उद्योगांचे प्रकाराबाबतची माहिती दिली. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या प्रकल्पांची देखील सविस्तर माहिती दिली. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणव झा यांनी सदरील योजनेत बँकेची भूमिका व आवश्यक माहिती दिली. जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान पाटील यांनी प्रधानमंत्री सुष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकेचे निरासन केले.

यावेळी कृषी उपसंचालक सी.बी. पाटील, नोडल अधिकारी स्मार्ट तथा उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर दादाराव जाधववर, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राउत, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हास्तरीय कक्षाचे नितीन इंगळे, मंडळ कृषी अधिकारी एम.के.वाल्हे, अमित भांबरे, कृषी विभागातील अधिकारी,कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यशाळेचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी केले.

10/09/2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार; शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती

जळगाव,दि.10- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर झाला आहे.

मंगळवार दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोरा, जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा) दुपारी 2.30 वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण. दुपारी 2.50 वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि.जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भुमीपुजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव), दुपारी 3.30 वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

आतापर्यंत ज्यांनी इंडियाचा गवगवा केला, आता त्यांनाच इंडियाची अॅलर्जी होऊ लागली आहे : उद्धव ठाकरेजळगाव, दि.१०- आतापर्यंत ...
10/09/2023

आतापर्यंत ज्यांनी इंडियाचा गवगवा केला, आता त्यांनाच इंडियाची अॅलर्जी होऊ लागली आहे : उद्धव ठाकरे

जळगाव, दि.१०- आतापर्यंत ज्यांनी इंडियाचा गवगवा केला, आता त्यांनाच इंडियाची अॅलर्जी होऊ लागली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख (ठाकरे गट) उध्दव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर केली. महापालिकेच्या आवारात साकारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते.

यावेळी खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. जयश्री महाजन, सुनील महाजन व कुलभूषण पाटी यांच्याहस्ते सव्वा किलो चांदीची तलवार ठाकरे यांना भेट देऊन सत्कार करण्यात आला.

महापालिका आवारात उभारण्यात आलेला पुतळा किती
फुटाचा व जगातील सर्वात उंच पुतळा कुठे आहे हे सांगायची गरज नाही. पुतळ्याची उंची ठिक आहे, पण कामाची उंची कधी गाठणार असा सवाल त्यांनी मोंदीना नाव न घेता केला. सरदार पटेल दूरदृष्टीचे होते. यांनी त्या काळात आरएसएसवर बंदी आणली होती. त्य पक्तीला स्वातंत्र्य प्रेम म्हणजे काय, देशप्रेम काय हे पक्क कळत होतं. १७ सप्टेबर रोजीच त्यांनी मराठवाडा स्व केला. याच दिवशी जिनांचं निधन झालं होतं. तरी ດ पटेलांनी त्या दिवशी कारवाई केली. जशी मराठवाड्यात कारवाई झाली तशी मणिपुरात कारवाई करण्याची हिमंत यांची होत नाही. हे कसले आले पोलादी पुरुष, हे तर तकलादू पुरुष आहेत, अशी टिका ठाकरे यांनी केली.

Address

Jalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalgaon News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jalgaon News:

Share

Our Story : Jalgaon News

जळगाव जिल्ह्यातील क्षणाक्षणाची खबर जगाला त्वरित देणारे एकमेव ऑनलाईन माध्यम !